मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात परिवर्तनाची नांदी म्हणजे भाजपचा विजय असून महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण आहे. राज्यात लोकाभिमुख सरकार आणेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या विजयानंतर म्हणाले.
फडणवीस म्हणाले कि, “राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते घेतली होती. आता विधान परिषद निवडणुकीत १३४ मते घेतली. महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे. पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते. पण काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा जास्त मते घेतली. आमच्या उमेदवारांनी प्रचंड मते घेत विजय मिळवला.” पुन्हा एकदा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना या विजयात महत्त्व असल्याचे ते म्हणाले. सर्व पक्षांतील आमदार आणि अपक्षांचे आभारही त्यांनी या वेळी मानले. आमचा संघर्ष जनतेसाठी आहे, सत्तेसाठी नाही. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. महाविकास आघाडीविरोधात जनतेत खदखद आहे, असंदेखील ते म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेत भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे असलेल्या आमदारांच्या संख्येत मोठं अंतर आहे. मात्र तरीही दोन्ही निवडणुकांमध्ये दोन्ही बाजूंचे सारखेच उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी तीन उमेदवार विजयी झाले. तर विधान परिषदेच्या एकूण १० जागांपैकी प्रत्येकी ५ जागा भाजप आणि महाविकास आघाडीला मिळाल्या.




