धुळे : धुळे शहरातील साक्रीच्या यशवंत नगर येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आठ वर्षांच्या डिंपल मनोहर वानखेडे हिचा फुगा फुगवताना दुर्दैवी मृत्यू झाला. फुगा फुगवताना अचानक तो फुटला आणि त्याचा तुकडा डिंपलच्या घशात अडकला. यामुळे तिला श्वास घेण्यात अडचण येवू लागली आणि यात तिने जीव गमावला.
डिंपल आपल्या कुटुंबासोबत यशवंत नगर येथे राहत होती. ती घराच्या अंगणात खेळत असताना तिने फुगा फुगवला. त्यावेळी हा रबरी फुगा अचानक फुटला आणि त्याचा तुकडा डिंपलच्या घशात अडकला. घशात अडकलेला तुकडा श्वास घेण्यात अडचण निर्माण करू लागला आणि त्यामुळे डिंपल रडू लागली. घरीच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ आपल्या खाजगी वाहनाने तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी चिमुकलीला तपासून मृत घोषित केलं.
डिंपलच्या मृत्यूने तिच्या कुटुंबाला धक्का बसला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेची नोंद धुळे शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.