मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील दिंडोशी कोर्टाने नोटीस बजावली आहे. ५ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. या नोटिशीनंतर मनसे आक्रमक झाली असून, याची किंमत अॅमेझॉनला मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसे आणि अॅमेझॉन वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्या वेबसाइटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मनसेने अॅमेझॉनकडे केली होती. तसे केल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते बेवसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अॅमेझॉनकडून उत्तर न मिळाल्याने मनसेने अॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेतली. त्यानुसार ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ ही मोहीम सुरू केली. त्यापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अॅमेझॉनच्या बीकेसी येथील कार्यालयावरही धडक दिली होती.
मराठी भाषेचा वापर करण्याबाबत मनसेकडून अॅमेझॉनविरोधात मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, अॅमेझॉनने कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर कोर्टाने राज ठाकरे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिशी बजावल्या आहेत. त्यामुळे मनसे अधिक आक्रमक झाली आहे. मनसे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी अॅमेझॉनला आगामी काळात याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात जर अॅमेझॉनला मराठी भाषा मान्य नाही, तर आम्हालाही महाराष्ट्रात अॅमेझॉन मान्य नाही, असं यावेळी अखिल चित्रे म्हणाले.