ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवीन दोन प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे सगळ्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमधून येणारी विमानंही थांबवण्यात आली असली तरी ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचं संक्रमण सुरू असतानाच नागपूरमध्ये परतलेला एक २८ वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नागपूरमधील नंदनवन येथील रहिवाशी असलेला हा तरुण पुण्यात एका कंपनीत कामाला आहे. महिनाभरापूर्वी कंपनीच्या कामानिमित्त तो इंग्लडला गेला होता. २९ नोव्हेंबरला तो नागपूरला परतला. सुरूवातीला त्याला होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं होत तरीही तो घरी न राहता शहरात फिरला. त्यानंतर त्याला कोरोनाची लक्षणं दिसून आली.
१५ डिसेंबर रोजी त्याने नंदनवन येथील आरोग्य केंद्रात चाचणी केली. रिपोर्टमध्ये त्याला कोरोना झालेला असल्याचं आढळलं. हा तरुण इंग्लडवरून परतलेला असल्यामुळे त्याला विशेष कक्षात दाखल करण्यात आलं असून स्वतंत्र ठेवण्यात आलं आहे. त्याचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर त्याला कोणता नक्की कोरोना झाला आहे, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान कुटुंबीयांसह १० जण त्याच्या संपर्कात आलेले आहेत.