मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना पाहुणा जात नाही आहे. हातपाय पसरत आहे. शहरातून ग्रामीण भागात पसरतोय. परत लॉकडाऊन करावा लागेल असे आपल्याला वागायचे नाही. मानवी त्वचेवर व्हायरस 9 तास राहतो. त्यामुळं नको तिथे हात लावू नका, तोंडाला लावू नका आणि सतत हात धुवत रहा. सार्वजनिक ठिकाणी, शौचालयातदेखील मास्क काढायचा नाही. मास्क घातलाच पाहिजे, योग्य पद्धतीनेच. तो गॉगल नाही, तोंडावर घाला. नाक, तोंड झाकुनच ठेवायला हवे. सर्वांनी! मास्क तोंडावर असला तरी डोळे उघडे ठेवा, समोरच्याचा मास्क नीट नसेल तर सांगा कारण तो कुठुनही शरीरात प्रवेश करु शकतो, असं ठाकरे यांनी सांगितलं.
मला गर्दी नकोय, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत इतक्यात तरी लोकल पूर्ण क्षमतेने सुरु होणार नाही. राज्यातंर्गत ट्रेन वाहतूक सुरु केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. लोकलची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. ती मागणी मान्य झाल्यानंतर आणखी काही लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देऊ असं त्यांनी सांगितलं.
जीम सुरु करण्याची मागणी होत आहे, त्याबद्दल लवकर नियमावली आखून देऊ असं ते म्हणाले. जीममध्ये व्यायाम करताना, हार्टच पम्पिंग रेट जास्त असतो. त्यामुळे श्वासोश्वास वाढतो आणि त्यातून कोरोनाचा प्रसार होऊ शकतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मंदिर उघडण्याची मागणी होत आहे, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचं प्रेम आहे”. “तंगडयात तंगडं घालून मंदिर बंद ठेवायची आमची इच्छा नाही. उघडलेल्या दारातून समृद्धी आली पाहिजे कोरोना नको” असं उद्धव ठाकरे म्हणाले.




