सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एकेरीत उल्लेख केला होता. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून राऊतांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला, यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधानांचा बाप काढणारे, अर्णब गोस्वामी यांना सभ्य भाषेत बोलण्याचा उपदेश करत आहेत. मुख्यमंत्र्यांचा अपमान जर राज्याचा अपमान असेल तर पंतप्रधानांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान नव्हता का?, काय म्हणावं याला ‘आपला तो बाब्या…’ की ‘पेरावे ते उगवते’?, अशा शब्दात भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर आणि राऊतांवर बोचरी टीका केली आहे.
भातखळकर म्हणाले की, ज्यांनी प्रधानमंत्र्यांचा बाप काढला, अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये वारंवार आमच्यासारख्या विरोधकांचा उल्लेख केला, त्यांना नितीमत्तेची आठवण येत आहे, हे पाहून आश्चर्य वाटतंय. हे जनमतावर निवडून आलेले मुख्यमंत्री नसून जनतेचा विश्वासघात करुन झालेले मुख्यमंत्री आहेत, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावे. मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, हे संजय राऊतांचं म्हणणं अत्यंत हास्यास्पदच आहे.




