राळेगण सिद्धी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या उपोषणाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपला यश आलं आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. फडणवीस यांनी याआधी देखील अण्णांची भेट घेतली होती. आज केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यासह पुन्हा अण्णांची भेट घेतली आणि अण्णांची मनधरणी केली.
यावर बोलताना अण्णा म्हणाले की, आम्ही पंधरा मुद्दे केंद्र सरकारला दिले आहेत. त्या मुद्द्यांवर उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ती कारवाई होईल असा मला विश्वास वाटतो. म्हणून उद्या होणारं उपोषण मी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णांनी दिलेले सगळे मुद्दे आम्ही केंद्र सरकारकडे मांडले. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आले आहेत. उच्चाधिकारी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला सहा महिन्याचा अवधी असेल. अण्णा देतील ती नावं या समितीत असतील. अण्णांना दिलेल्या आश्वासनानुसार लोकपाल नियुक्त झाले. अण्णा हजारेंच्या मागणीनुसार समिती स्थापन करण्यात येणार आहे. स्वतः कृषिमंत्री, नीती आयोगाचे सदस्य आणि अण्णा सुचवतील त्या व्यक्तींची त्यामध्ये निवड केली जाईल. अण्णांना दिल्लीत आमंत्रित करुन एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत कृषी संदर्भात आणि निवडणूक सुधारणेसंदर्भात चर्चा करुन कारवाई करण्यात येईल. आम्ही अण्णांना या समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्याची आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली. अण्णांनी ही विनंती मान्य केली आहे, असं ते म्हणाले.
Interacting with Media after meeting Shri Anna Hazare at Ralegan Siddhi https://t.co/4c17H36Giu
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2021




