नाशिक : बांधकामावर पाणी मारताना विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. मंगेश प्रवीण राणे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. सातपूर भागात विद्युत तारा भूमिगत करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ही दुःखद घटना घडली आहे.
सात माऊली चौकात राहणारा मंगेश प्रवीण राणे रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बांधकामावर पाणी मारण्यासाठी आला होता. बांधकामाला लागूनच ११ केव्ही विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्यामुळे ठेकेदाराने मंगेशला बांधकामाच्या ठिकाणी विद्युत तारांपासून जपून काम करण्याबाबत सूचना केली होती. परंतु, बांधकामावर पाणी मारताना मंगेशने घाईगडबड केल्यामुळे चुकून त्याच्या हाताचा धक्का विद्युत वाहिनीला लागला असावा, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलवडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, लोंबकळणाऱ्या विद्युत तारा भूमिगत करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले होते. नागरिकांनी घरासमोरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारांपासून सावध व सुरक्षा बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.