नालासोपाऱ्यात केवळ 11 वर्ष जुनी चार मजली इमारत कोसळली. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रहिवाशांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, तुलिंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नालासोपारा पूर्व मजेठिया पार्क परिसरात ‘साफल्य’ ही एकूण 20 फ्लॅट असलेली चारमजली इमारत होती. 2009 मध्ये ही अनधिकृत इमारत बांधण्यात आली होती. इमारत धोकादायक झाल्याने राहिवाशांना महापालिकेने बाहेर पडण्याची नोटीस दिली होती. त्यामुळे 15 कुटुंब आगोदरच दुसरीकडे राहण्यासाठी गेली होती. मात्र 5 कुटुंब याच इमारतीत आपला जीव मुठीत घेऊन राहत होती.
इमारतीच्या काही भिंतींची माती काल (1 सप्टेंबर) रात्री 10 वाजल्यापासूनच पडत होती. त्यामुळे रहिवाशी घाबरलेल्या अवस्थेत होते. रात्री 12 च्या सुमारास सर्व रहिवासी इमारतीच्या खाली आले. मध्यरात्री एक वाजता सर्वांच्या डोळ्यासमोर अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ही चारमजली इमारत कोसळली.




