जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. “संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी यादृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे,” असं जागतिक आरोग्य संघटनेचे मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटलं आहे.
“प्राथमिकता असणार्या लोकसंख्येपर्यंत लस पोहोचावी यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात जागतिक प्रयत्नाची गरज आहे यावर मी भर देऊ इच्छिते,” असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. आपत्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याने अनेक देशांमधील नियामक प्रशासनाला कोरोना लसीच्या आयात आणि वितरणाला परवानगी देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे.




