तैवानने चीनचे सुखोई-३५ फायटर जेट पाडल्याचा दावा करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘तैवानने चीनचं सुखोई विमान पाडलं?’ अशा मथळ्याच्या अनेक बातम्या सध्या इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत, मात्र आम्ही हे वृत्त फेटाळून लावत आहोत. ही माहिती खोटी असून यात थोडीही सत्यता नाही, असं तैनावने स्पष्ट केलं आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने अशाप्रकारे खोट्या बातम्या देऊन लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले आहे.
या खोट्या माहितीमुळे अनेकांचा चुकीचा समज होत असून हे पूर्णपणे अयोग्य आहे. हवाई तसेच सागरी सुरक्षेसंदर्भातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. यासंदर्भातील काही माहिती असल्यास आम्ही ती वेळोवेळी जारी करु. खोटी माहिती पसरु नये यासाठी आम्ही योग्य वेळी घडणाऱ्या घडामोडींची माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे. खोट्या माहितीमुळे अशांतता निर्माण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.




