अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंकाविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (15 फेब्रुवारी) नकार दिला. परंतु, त्याची दुसरी बहीण मितूविरुद्ध दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याचा आदेश देण्यात आला त्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे. ही FIR सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने दाखल केली होती. पटना येथे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रिया चक्रवर्तीचे नाव मुख्य आरोपी म्हणून होते.
न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने एफआयआर रद्द करण्याची मागणी करणार्या याचिकांवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. रियाने तिच्या एफआयआरमध्ये या दोघांवर दिल्लीत एका डॉक्टरांच्या सहकार्याने सुशांतसाठी बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केल्याचा आरोप केला होता. रियाने 7 सप्टेंबर 2020 रोजी दाखल केलेल्या FIR मध्ये असे लिहिले होते की सुशांतने या प्रिस्क्रिप्शननुसार औषधे घेणे सुरू केल्याच्या 5 दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला.
रियाचा आरोप आहे की, मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार यांनी प्रियंका आणि मितूच्या सांगण्यावरून ही औषधे ‘बेकायदेशीरपणे’ लिहून दिली होती. 6 ऑक्टोबर 2020 रोजी वकील माधव थोरात यांच्यामार्फत सुशांतच्या दोन्ही बहिणींनी याचिका दाखल करून एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती.
मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, प्रियांका सिंह विरोधात खटला चालविला जाईल आणि तिच्याविरोधात चौकशी करण्यात कोणताही अडथळा येऊ नये. ही औषधे खाल्ल्याने आणि औषधांचे कॉम्बिनेशन चुकीचे झाल्यामुळे सुशांतचा मृत्यू झाल्याची भीती रियाने व्यक्त केली होती. यावर सुशांतच्या दोन बहिणींनी आरोप केला होता की सुशांतच्या मृत्यूची सुरू असलेली चौकशी भटकावण्यासाठी रियाने FIR दाखल केली.