मुंबई : होमबेल फिल्म्स, एए फिल्म्स आणि एक्सेल एंटरटेन्मेंटकडून 2021च्या नव्या वर्षात प्रेक्षकांना चांगलीच भेट मिळालीय. नवीन वर्षाची सुंदर सुरुवात करून या प्रॉडक्शन हाऊसेसने त्यांच्या केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) या चित्रपटाचा टीझर दिलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच रिलीज केला. यंदा प्रदर्शित होणारा केजीएफ 2 चित्रपटाचा टीझर सुपरस्टार यशच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट स्वरूपात 8 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण तो एक दिवस आधीच रिलीज करण्यात आलाय.
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांच्या मागणीनुसार केजीएफ 2 चा पहिला टीझर 7 जानेवारी 2021 रोजी रात्री 9: 29 वाजता होमबेल फिल्म्सच्या यू ट्युब वाहिनीवर प्रसिद्ध केला. एक्सेल एन्टरटेन्मेंट आणि एए फिल्म्स यंदा चित्रपटगृहात हिंदीतील महत्त्वाकांक्षी चित्रपट केजीएफ 2 प्रदर्शित करणार आहेत आणि निर्माते त्यापासून खूप खूश आहेत.
टीझरबद्दल बोलताना सुरुवातीला आपल्याला रॉकीची आई आणि तिचे बालपण दिसेल. रॉकीच्या आईने त्याला कसे वाढविले, तो कसा मोठा झाला आणि त्याने आपल्याला जे वचन दिले होते ते तो आता पूर्ण करेल. टीझरमध्ये रविना टंडन यांना खासदार म्हणून दाखवले जाऊ शकते. तर तिथेच संजय दत्त पाहायला मिळणार आहे. अद्याप त्याचा चेहरा समोर आलेला नाही. पहिला भाग संपल्यानंतर तेथून ‘केजीएफ-2’ची सुरुवात होणार आहे. दुसऱ्या सीक्वेलमध्ये यशसह संजय दत्त आणि रविना टंडन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यश आणि संजय दत्त यांच्यातील संघर्ष पाहण्यास मिळणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘केजीएफ चॅप्टर -1’ने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. या चित्रपटामुळे यशला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यामुळे या चित्रपटाच्या सीक्वलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा सिक्वल कन्नड, हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.




