पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘हँडसम हिरो’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंबी येथे ते बंद खोलीत मृतावस्थेत आढळून आले. दुर्गंधी येत असल्याने शुक्रवारी दुपारी शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असता घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून अभिनेते रवींद्र महाजनी हे त्यांच्या आंबी येथील घरात एकटेच राहत होते. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. महाजनी यांच्या निधनाने चाहत्यांवर शोककळा पसरली असून मराठी चित्रपटसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे.
रवींद्र महाजनी झाले होते कर्जबाजारी :
रवींद्र महाजनी यांना मराठी मनोरंजन विश्वातील विनोद खन्ना असेही संबोधले जाते. मात्र, रवींद्र महाजनी यांना एकेकाळी फसवणूक, कर्जाचा डोंगर अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. रवींद्र महाजनी यांनी अभिनयासोबतच जोडीला उत्पन्नाचे वेगळे साधन हवे यासाठी व्यावसायिक जगात पाऊल ठेवले होते. ते बांधकाम क्षेत्रात सहभागी झाले होते. मात्र, तिथे त्यांची फसवणूक झाली, त्यांचे पैसे बुडवण्यात आले,त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्यांचे राहते घरही जप्त करण्यात आले होते.
गश्मीर कुटुंबासाठी खंबीरपणे उभा राहिला :
दरम्यान, त्या कठीण प्रसंगी रवींद्र महाजनी यांचा मुलगा-अभिनेता गश्मीर महाजनी अवघ्या 15 वर्षांचा होता. रवींद्र महाजनी यांची पत्नीही त्यावेळी कमी पगाराची नोकरी करत होती. मात्र, वडिलांचे दुःख पाहून त्यावेळी गश्मीर कुटुंबासाठी खंबीरपणे उभा राहिला होता. गश्मीरने घराचा आर्थिक भार उचलला. कर्ज फेडण्यासाठी त्याने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी डान्स क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि स्वतःची डान्स अकादमी सुरू केली. सोबतच नाटक, सिनेमांमध्ये मिळेल ते काम तो करू लागला. त्यातून आलेल्या पैशातून त्याने वडिलांवरचं कर्ज फेडलं. त्यानंतर त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि आज गश्मीर मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.




