बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. रुग्णालयातील सूत्रांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं.
अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत तिची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. त्याने स्वतःची निर्माता म्हणून ओळख करून दिली होती. कामानिमित्त मालवी त्याला फक्त एकदाच भेटली होती. सोमवारी ती आपल्या घराबाहेर पडली. त्यावेळी हल्लेखोर कार घेऊन बाहेर थांबला होता. त्याने मालवीला भर रस्त्यात अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विरोध केला. त्यावर त्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. तिच्यावर चार वार केले. हल्ला केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.
मालवी मल्होत्रा हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी योगेश महिपाल सिंह विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. मालवी हिने काही बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे.