नवी दिल्ली : रुग्णालयात एका नर्सने दोन महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात बाळाचा हातही फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना 24 जुलै रोजी रात्री घडली. सीसीटीव्ही फुटेजमधून नर्सने बाळाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नर्सला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये राहणाऱ्या सबीब यांनी आपल्या 2 महिन्यांच्या बाळाला उपचारासाठी दिल्लीतील एका नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. सबीब यांची पत्नी गुलाफ्शाने 22 मे रोजी हाथरसच्या रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला होता. यानंतर १६ जुलै रोजी मुलगा अहान याची तब्येत बिघडल्यामुळे त्याला अलिगढमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, इंफेक्शन जास्त असल्यामुळे त्याला दिल्लीच्या विवेक विहारच्या केयर न्यू बॉर्न अँड चाईल्ड सेंटरमध्ये दाखल केले.
बाळाचे वडील सबीब दिवसातून एकदा नर्सिंग होममध्ये यायचे. त्यांना 24 जुलै रोजी नर्सिंग होममधून फोन आला आणि सांगण्यात आलं की तुमच्या बाळाला दुखापत झाली आहे आणि त्याचा चेहराही सुजलेला आहे. सबीब तात्काळ रुग्णालयात गेले आणि त्यांनी नर्सिंग होममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करण्यास सांगितले. त्यात एक नर्स बाळाला मारहाण करताना दिसत होती. सबीब यांना नर्सिंग होमकडून शांत राहाण्याची धमकी देण्यात आली होती.
सबीब यांच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजमधून खुलासा झाला की सौम्या नावाची नर्स 24 जुलैला पहाटे साडेतीनच्या सुमारास बाळाला मारहाण करत होती. यानंतर बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे चेकअप केलं असता बाळाचा हातही फ्रॅक्चर झाल्याचं समजलं. यानंतर बाळाचे वडील सबीब यांनी विवेक विहार ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास करत आहेत.




