हैदराबाद : आंतरधर्मीय विवाह केलेल्या २५ वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांनी कथितरित्या हत्या केली. बिल्लापुरम नागराज हे आपली पत्नी अश्रीन सुलतानासोबत बुधवारी रात्री मोटारसायकलवरून जात होते, त्यावेळी त्यांच्यावर सरूरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीएचएमसी कार्यालयाजवळ चार-पाच जणांनी हल्ला केला. नागराज यांच्यावर हल्लेखोरांनी चाकूने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रंगारेड्डी जिल्ह्यातील मारपल्ली गावात राहणारा नागराज आणि शेजारील घनापूर गावातील सुलताना यांचे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. नागराज हे कार शोरूममध्ये सेल्समन म्हणून काम करत होते. तथापि, सुलतानाच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता आणि त्यांनी तिला नागराज यांच्याशी संबंध न ठेवण्याचा इशारा दिला होता.
मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला सुलताना नागराजसोबत पळून गेली आणि तिने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले. 31 जानेवारी रोजी लाल दरवाजा परिसरातील आर्य समाज मंदिरात त्यांनी लग्न केले. जीवाला धोका असल्याची जाणीव असल्यामुळे हे जोडपे विशाखापट्टणमला राहत होते. नागराजच्या आई-वडिलांनी सांगितले कि, त्यांनी नागराजचा जीव वाचवण्यासाठी सुलतानाच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये देण्याची ऑफर देखील दिली होती. नागराज आणि सुलताना पाच दिवसांपूर्वी हैदराबादला परत आले होते आणि सरूरनगरमधील पंजा अनिल कुमार कॉलनीत राहत होते. मात्र, सुलतानाच्या घरच्यांना त्यांच्या येण्याची माहिती मिळाली.
बुधवारी रात्री नागराज आणि सुलताना दुचाकीवरून घरातून निघाले असता सुलतानाचा भाऊ आणि इतरांनी त्यांचा पाठलाग करून जीएचएमसी कार्यालयाजवळ त्यांच्यावर हल्ला केला. सुलतानाचा आरोप आहे की तिचा भाऊ आणि इतर काहींनी नागराजवर हल्ला केला, मात्र तरीही तिने त्यांना सोडण्याची विनंती केली.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोघांना अटक केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुलतानाचा भाऊ आणि मेव्हण्याला अटक करण्यात आली आहे. नागराज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया रुग्णालयात हलवण्यात आला.




