पुणे : पुण्यात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्रभर टीव्ही चालूच राहिल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा दाबून हत्या केली. या महिलेच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळमधील चांदीवाडीमध्ये ही घटना घडली असून योगेश जाधव नावाच्या 26 वर्षीय व्यक्तीने आपल्या 20 वर्षीय पत्नीची हत्या केली. या जोडप्याला 7 महिन्यांपूर्वीच एक मुलगी झालेली आहे. मुलगी झाल्याचा राग या व्यक्तीच्या मनात होता. मुलगी झाल्यापासून तो पत्नीचा सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. त्यातच रात्रभर टीव्ही चालू राहिल्यामुळे संतापाच्या भरात त्याने पत्नीची गळा दाबून हत्या केली. काही ग्रामस्थांनी तिच्या मृत्यूची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी मृत महिलेची ओळख चांगुणा जाधव अशी केली असून तिचा पती योगेश जाधव जो व्यवसायाने ट्रक चालक आहे, त्याला अटक करण्यात आली आहे. चांगुनाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा फोन ट्रॅक केला आणि त्याचा शोध घेतला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.




