बुलंदशहर : दारूच्या नशेत असलेल्या वडिलांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चिमुकलीचा रविवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सायना येथील मोहल्ला कसाईवाडा येथील रहिवासी असलेल्या इक्बाल यांनी 4 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, इक्बाल यांची भाची शाहीन आपल्या दोन वर्षांची मुलगी सोफिया आणि नवरा कल्लू यांच्यासोबत लग्नाला आली होती.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कल्लू त्याच्या पत्नीला हापूरला घरी जाण्याविषयी सांगत होता. मात्र, शाहीनने दुसऱ्या दिवशी जाण्याचे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला. बराच वेळ भांडण झाल्यानंतर दारूच्या नशेत कल्लूने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीला बेदम मारहाण केली. यामध्ये दोन वर्षांची सोफिया गंभीर जखमी झाली. गंभीर अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयातून दिल्लीला उपचारासाठी नेण्यास सांगण्यात आलं. या मुलीवर दोन दिवसांपासून दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान या चिमुकलीचा मृत्यू झाला.
मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये संताप निर्माण झाला आहे. आरोपीच्या नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, निरागस मुलीला मारहाण करणार्या वडिलांना काहीच वेदना झाल्या नाहीत. अशा व्यक्तीला समाजात राहण्याचा आणि जगण्याचाही अधिकार नाही. कायद्याने त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी.




