बिहार : बिहारमधील रोहतासच्या बिक्रमगंज शहरात शनिवारी रात्री उशिरा दुचाकीवरून जात असलेल्या भाऊ आणि बहिणीवर २ जणांनी ऍसिड हल्ला केला, त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यापैकी बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे. या क्रूर हल्ल्यात पीडितेने तिचे दोन्ही डोळे गमावले आहेत. या घटनेत तिच्या भावालाही गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंजवीत सिंह आपल्या बहिणीसोबत शनिवारी रात्री बाईकवरून वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात होता. त्याचवेळी हेल्मेट घालून दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी भाऊ आणि बहिणीच्या दुचाकीचा पाठलाग सुरू केला आणि काही अंतरावरच त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला. त्या तरुणाने बाटलीत भरलेले काही पदार्थ दोघांच्या अंगावर फेकले. यानंतर दुचाकीवरील नियंत्रण सुटले. तेथे उपस्थित लोकांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. अंजवीत सिंह याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र या हल्ल्यातील पीडित मुलगी जीवन-मरणाशी झुंज देत आहे.
ही तरुणी शहरातील धनगाई रोडवर असलेल्या डान्सर मोहल्लामध्ये राहणाऱ्या अजय नट यांची मुलगी आहे. ती रात्री 9 च्या सुमारास वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या 30 वर्षीय भावासोबत बाईकवरून जात होती. तिथे ती नृत्य सादर करणार होती. मात्र, त्याआधीच तिच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.




