पिंपरी चिंचवड : चिखली येथे 9 वर्षांच्या मुलाचा निर्घृण खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या पालकांनी चिखली पोलिसात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. लक्ष्मण देवासी असे या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी हा 9 वर्षीय मुलगा काल (रविवार) दुपारपासून अचानक गायब झाला. त्याच्या आई- वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. अखेर त्याच्या आई- वडिलांनी चिखली पोलीस ठाणे गाठून रात्री ७ वाजेच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शोध घेतला असता मुलाचा मृतदेह त्याच्या घराच्या शंभर मीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. अज्ञात व्यक्तीने त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याचे दिसले. दरम्यान, याप्रकरणी चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत. अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचा अंदाज असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




