वाशिम : निर्दयी पित्याने आपल्या एक वर्षाच्या चिमुकलीला जिवंत पुरल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला. सुरेश प्रभाकर घुगे असे निर्दयी पित्याचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पत्नीवर असलेल्या संशयातून सुरेश याने हे भयंकर कृत्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील वाडीवाकड येथील सुरेश प्रभाकर घुगे (वय 27) हा पत्नी कावेरीसोबत शेतातील गोठ्यात राहत होता. या जोडप्याला तीन मुली असून सुरेशला नेहमीच कावेरीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. कालही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, त्यानंतर सुरेशने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी कावेरी आपला जीव वाचवण्यासाठी गावाकडे पळत गेली व तिने सर्व हकीकत आपल्या दिराला सांगितली. ती तिच्या दिरासह गावातील नागरिकांना घेऊन शेताकडे गेली असता चिमुकली कुठेही दिसत नव्हती. त्यांनी सुरेशला याबाबत विचारले असता तो म्हणाला की ही माझी मुलगी नसून मी तिला जिवंत गाडून टाकले आहे.
त्यानंतर त्याने दाखवलेल्या गावकऱ्यांनी उकरून पाहिले असता त्यात चिमुकली निपचित पडली होती. तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवेंद्रसिंग ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून आरोपी सुरेशला अटक केली.




