पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’नं महत्त्वाची घोषणा केली आहे. सीरमनं कोविशिल्ड लसीचे दर जाहीर केले असून अन्य देशांतील लसीपेक्षा कोविशिल्डचे दर कमी राहतील याची काळजीही घेण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या स्वाक्षरीनं या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लसीच्या निर्मितीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ५० टक्के लसीची विक्री खुल्या बाजारात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याला अनुसरून ‘सीरमनं’ पुढील दोन महिन्यांत उत्पादन वाढवून लस तुटवड्याच्या समस्येवर मात करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘येत्या काळात निर्माण होणाऱ्या लसीपैकी ५० टक्के लस भारत सरकारच्या लसीकरण कार्यक्रमासाठी पुरवली जाईल. उर्वरीत ५० टक्के लस राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना दिली जाईल, असंही ‘सीरम’च्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
कोविशिल्ड लसीसाठी राज्य सरकारला प्रति डोस ४०० रुपये तर, खासगी रुग्णालयांना प्रति डोस ६०० रुपयांना मोजावे लागणार आहेत. सध्या तातडीची परिस्थिती लक्षात घेता कॉर्पोरेट कंपन्यांना थेट लसीचा पुरवठा करता येणे अशक्य आहे. त्यामुळं कॉर्पोरेट कंपन्या व अन्य व्यक्तींनी राज्य सरकारच्या माध्यमातूनच वा खासगी रुग्णालयातूच लस घ्यावी. येत्या चार-पाच महिन्यात कोविशिल्ड खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली जाईल, असंही सीरमनं स्पष्ट केलं आहे.
IMPORTANT ANNOUNCEMENT pic.twitter.com/bTsMs8AKth
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) April 21, 2021