एखाद्या व्यक्तीला रक्ताची गरज असल्यास आणि तिला वेळेवर रक्त मिळाल्यास त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रक्त करते. म्हणूनच वेळोवेळी ‘रक्तदात्यांना रक्तदान’ करण्याचे आवाहन केले जाते, ज्यामुळे गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतील. “रक्तदाता” हा रुग्णांसाठी नेहमी आशेचा किरण ठरला आहे. रक्त हे कृत्रिमरीत्या तयार होत नाही. ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात. यासाठी आपण रक्तदाता म्हणून स्वतःहून स्वैच्छिक रक्तदान करणे महत्त्वाचे ठरते.
“रक्तदान हे श्रेष्ठ दान” आहे. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे रक्तदान हे जीवनदान, तसेच महादान असेही म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. रक्तदात्याला रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने व नियमित रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) हा कार्यक्रम सर्वप्रथम 14 जून 2004 रोजी “जागतिक आरोग्य संघटना,(डब्लू एच ओ) रेडक्रॉस आणि आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसेंट सोसायटी ऑफ इंटरनेशनल फेडरेशन” च्या वतीने सुरक्षित रक्तदान करण्यासाठी जनतेत जनजागृती व्हावी, या उद्देशाने साजरा करण्यात आला.
रक्तदाता म्हणून माझे रक्तदान महत्त्वाचे का?
- माझ्या रक्तदानाने जर एखाद्या रुग्णांचे प्राण वाचणार असतील तर त्यासाठी महत्त्वाचे.
- माझ्या रक्तदानाने थँलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल,ल्युकेमिया इ. अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना कधीही रक्ताची कमतरता भासू नये म्हणून माझे रक्तदान महत्त्वाचे
- अतिदक्षता, प्रसूती, अपघात, रक्तक्षय, अतिरक्तस्राव इ. आदी अशा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने रक्ताची आवश्यकता भासते, अशा रुग्णांसाठी माझे रक्तदान महत्त्वाचे
- माझ्या रक्तदानाने निश्चितच गरजूंना रक्त पुरवठा झाल्याचे समाधान मिळणार, यासाठी माझे रक्तदान महत्त्वाचे.!
- माझ्या रक्तदानाने माझ्या शरीरातील रक्तदाब, कोलेस्टेराँलचे प्रमाण योग्य नियंत्रण राहण्यासाठी, समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते.
- बोन मँरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते. रक्तदान केल्यानंतर चोवीस तास ते सात दिवसात नैसर्गिकरित्या रक्ताची झीज भरून निघते.
- रक्तदान केल्यानंतर नवीन पेशी तयार होण्यासाठी नव चेतना मिळते. रक्तदान प्रक्रियेत रक्तदानाची सुरक्षितता याचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे कोणतेही इजा किंवा आजार होण्याची शक्यता नसते.
- समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून निःस्वार्थीपणे, समाजहितासाठी, राष्ट्रसेवा म्हणून माझे रक्तदान महत्त्वाचे आहे. मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्यामुळे रक्तदानाविषयी प्रेरणा समाजात द्दढ करणे, निरोगी रक्तदात्यांची फौज करून रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी, या मागचा एवढाच उद्देश.
लेखन:
श्री. हेमकांत सोनार