बाळाच्या आगमनानंतर घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. बाळाच्या आईला आनंद तर असतोच पण तिला चिंता असते कि, बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? नवजात बाळाला पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही आवश्यकता नसते. स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. पण सहा महिन्यानंतर बाळाला काय आहार द्यायचा, याविषयी आज आपण जाणून घेऊ.
जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर विशिष्ट कालावधीत बाळाला काय खायला द्यायचे व किती? या आणि अजून अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला बालरोग तज्ञ डॉ. शाम दुर्गुडे देणार आहेत.
बाळाचा आहार – नवजात बाळासाठी आईचे दूध सर्वोत्तम, बाळाच्या आईला जर दूध व्यवस्थित असेल तर पहिले सहा महिने बाळाला इतर कशाचीही आवश्यकता नसते. बाळाला आईचे दूध कमी पडत असेल तर डॉक्टरांच्या सल्यानुसार वरचे दूध किंवा पूरक आहार सुरु करता येतो परंतु बाळाला दूध कमी पडते आहे याचे निदान बाळाच्या आईने किंवा घरच्यांनी करण्यापेक्षा डॉक्टरांनी केलेले कधीही चांगले. आईचे दूध हा बाळाच्या पोषक आहारातील महत्त्वाचा घटक असतो. त्यापासून बाळाचे पोषण व संरक्षणही होते.
साधारणतः आहार खालील प्रमाणे चालू करता येईल
- चार ते सहा महिने : भाताची पेज, डाळ, तांदळाची खीर (एक भाग मुगाची डाळ + तीन भाग तांदूळ एकत्र करून भाजून बारीक रवा करावा आणि नंतर पाण्यात शिजवून खीर करावी) त्यात साजूक तूप, मीठ, साखर घालावी. रव्याची खीर, नाचणी सत्व, तांदळाची खीर, मोसंबी, संत्री, सफरचंद, आदी फळांचा रस, डाळीचे पाणी, टोमॅटो सूप, उकडलेले बटाटे, गाजर इद्यादी द्यावे.
- सहा ते नऊ महिने : वरणा सोबत मऊ भात, अंड्याचा पिवळा बलक, बिस्कीट दूध, इडली, शिरा सुद्धा चालेल.
- नऊ ते बारा महिने : खिचडी, शिजलेला भात, मऊ पोळी, भाकरी दुधात किंवा वरणात मिश्रण करून द्यावे. पोहे उपमा वगरे द्यावा.
- एक वर्षानंतर : एक वर्षानंतर आईने अंगावरचे दूध कमी करत बंद करावे, संपूर्ण आहार देण्यास सुरवात करावी. म्हणजे जेवणाच्या तक्रारी कमी होतील. सर्वात महत्वाचे जे आईवडील खातात तेच पदार्थ मुलांना द्यायचे आहेत. जे आईवडील खात नाहीत ते मुलांनाही देऊ नये. (चॉकलेट, मॅग्गी, कुरकुरे)
- एक वर्षांपूर्वी हे पदार्थ देणं टाळावे : बाळ वर्षांचं होईपर्यंत काही पदार्थ त्याला देऊ नयेत. ते म्हणजे अंडय़ाचा पांढरा भाग, मीठ, साखर, (कमी प्रमाणत दयावे)तळलेले पदार्थ, मध, शेंगदाणे, काजू, पिस्ते (याने अॅलर्जी होऊ शकते), गाईचं दूध, (डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय)चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स देऊ नये.
बाळाला दिवसातून किती वेळा खायला दयावे :
- ६ ते ९ महिने – २ वेळा
- ९ ते १२ महिने – ३ ते ४ वेळा
जन्मापासून ५ वर्षापर्यंत बाळाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर ठराविक कालांतराने बाळाचे वजन, उंची व शरीराची इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. वाढ योग्य होत नसल्यास त्या दृष्टीने तपासणी करून अयोग्य वाढीची कारणे शोधून काढता येतील. सदर कारणानुसार बालकावर उपचार करून पुढील गुंतागुंत निश्चितपणे टाळता येईल. ५ वर्षापर्यंत बालकाची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी :
- मुलांना पुरेसा पौष्टिक आहार दया. पण त्यांना अन्न खाण्यासाठी दुराग्रह करू नका. बळजबरी केली तर अन्नाचा परिणाम होणार नाही.
- रोगप्रतिबंधक लस मुलांना टोचून घेण्याची खबरदारी घ्या.
- मुलांना मार्गदर्शन करा. शिकवत राहा, त्यांना प्रेम, माया दया. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवा. त्यांना उगीचच सतत आपल्या संरक्षणाखाली ठेवू नका. त्यांना मोकळेपणाने खेळू बागडू दया.
- तीन ते पाच वर्षापर्यंत दुसरे मुल होऊ देऊ नका आणि दुसऱ्या मुलाच्या आगमनाच्या वेळी पहिल्याच्या मनाची तयारी करून ठेवा.
- मुलांना शाळेची गोडी लावा.
- सुखी कुटुंबासाठी आदर्श माता हवीच. आई ही कुटुंबाचा केंद्रबिंदू असते. कुटुंबाचे स्वास्थ, सुख, आरोग्य आईवरच अवलंबून असते. आजचे मूल उद्याची आई किंवा पिता होणार असते. त्यासाठी, मुलाच्या प्रगतीत आपला फार मोलाचा वाटा आहे.
डॉक्टर शाम दुर्गुडे
मातोश्री हॉस्पिटल, संगमनेर
7218636392
www.matoshreehospitals.in
Matoshrihospitals@gmail.com