शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे आरोग्यासाठी घातक आहे.योग्य राहणीमान, योग्य प्रमाणात योग्य वेळी घेतला जाणारा आहार निरोगी राहण्यास मदत करतो.
आपण किती खातोय यापेक्षा आपण काय खातो, याकडे लक्ष द्या. कधी फळे, कधी कोशिंबीर, कधी कडधान्ये, कधी सूप घेण्याचा प्रयत्न करा.
वजन कमी करायचे असेल, तर उपवास हा उपाय होऊ शकत नाही. यामुळे शरिराला उर्जा मिळत नाही, थकवा येतो, शरीर मरगळून जाते. मात्र पाचकरस निर्माण होतच असतात. त्यांचा विपरीत परिणाम होतो; त्यालाच आपण पित्त झाले असं म्हणतो. हे सगळे अपाय होऊ नये म्हणून शरिरात सदैव अन्न असले पाहिजे. मात्र ते इतके नको की अपचन होईल.
जर पोट पूर्ण रिकामे असेल तर पचनसंस्थेकडून मेंदूला सिग्नल जातो, “शरिरात अन्न नसल्याने शरिराची उपासमार होत आहे”. मेंदूकडून प्रतिसाद जातो, मिळेल ते अन्न साठवून ठेवा. मग याचा परिणाम म्हणून नंतर जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपण खातच राहतो कारण तशी ऑर्डर अगोदरच मेंदूकडून मिळालेली असते. शिवाय त्यातील जास्तीत जास्त अन्नाचे चरबीमध्ये रुपांतर होते कारण शरीराला ऊर्जा साठवून ठेवण्याची आज्ञा मेंदू देतो. कधी कधी यामुळे अपचन होते. म्हणून अन्न खाल्ले तर पाहिजेच पण काय खावे, कसे खावे, किती खावे आणि किती वेळा खावे हे महत्वाचे असंते.
काय खावे ?
आपण ज्याला नियमित आहार म्हणतो आपल्या घरात बनवलेले जेवण आपल्या घरच्या खाद्यसंस्कृतीप्रमाणेच असले पाहिजे. तेलाचे पदार्थ, भात वगैरे खायला काहीच हरकत नाही; मात्र ते पचवण्यासाठी व्यायाम हवा. नाहीतर असे वजन वाढवणारे पदार्थ कमी खाल्लेले चांगले. कधी कधी चेंज म्हणून ठीक आहे.
कसे खावे?
जेवताना पूर्ण लक्ष जेवणाकडेच असावे. शांतपणे व संयमाने जेवण करावे नाहीतर खाल्लेले अंगाला लागत नाही व अपचन होते.
किती खावे?
पोट भरले असे वाटले कि जेवण थांबवावे. हवे तितकेच ताटात वाढून घ्यावे. उरलेले संपवायचे म्हणून कधीच खाऊ नये.
किती वेळा खावे?
पहिले जेवण किंवा नाश्ता सकाळी उठल्यानंतर १ तासात करावा. कारण झोपल्यानंतर २-३ तासात पूर्ण अन्नाचे पचन होते व नंतर ४-५ तास पोट रिकामे असते. आपल्याला ते जाणवत नाही कारण आपण झोपेत असल्याने उर्जेची फारशी गरज पडत नाही. सकाळी उठतो तेव्हा शरिराला अन्नाची गरज असते. उठल्या-उठल्या चहा घेतल्यामुळे अचानक साखर वाढते; त्याचा शरिरावर परिणाम होतो. नाश्ता घेतल्यानंतर काही वेळाने चहा घेतला तर ठीक आहे.
त्यानंतर दर दोन-तीन तासाने कमी प्रमाणात जेवण घेत रहावे. मधल्या वेळेला एखादे फळ, सरबत किंवा दूध घेऊ शकता. जास्त वेळा खाल्याने नैसर्गिकरित्या आपण कमीच खातो. शेवटचे जेवण मात्र रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी झाले पाहिजे.
शक्यतो जेवणाअगोदर व जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत होते. दिवसभरात भरपूर पाणी पिलं पाहिजे. आपल्या शरिरात दोन तृतिअंश भाग पाणी असते, त्यामुळे शरीराला पाण्याची नितांत गरज असते.
व्यायामाला पर्याय नाही. वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा, व्यायामात सतत बदल करा. दोन प्रमुख प्राणायाम अनुलोम-विलोम आणि कपालभाती व जमतील तसे योग प्रकार करावे. थोडा व्यायाम, वेळेत व संयमित जेवण याने वजन हळू हळू व परिणामकपणे कमी होईल व काही अपायही होणार नाही. स्वतःवर प्रेम करा आणि आनंदी राहा.