मुंबई : कुलदीप यादव खूप दिवसांपासून निराश आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीपला खेळण्याची खूपच कमी संधी मिळाल्या आहेत. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंडच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. त्याला गेल्या वर्षभरात खूपच कमी संधी मिळाल्या. साहजिक कुलदीपला जुने दिवस आठवले. तो म्हणाला, आज मला माही भाईची खूप आठवण येतेय. माही भाई असताना मी आणि युजवेंद्र चहल आम्हाला दोघांनाही खेळायला मिळायचं. माही भाईच्याच काळात मी हॅट्रिक घेतली, असं कुलदीप यादव म्हणाला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या भारतीय संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादवला स्थान देण्यात आलेलं नाही. आयपीएलमध्येही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघात संधी मिळत नाही, हे पाहून कुलदीपला दु:ख होतं आहे.
कुलदीप म्हटला कि, मला माही भाईची खूप आठवण येतीय. माही भाई विकेटच्या पाठीमागून सल्ला देत असायचा, बॅट्समनला पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यासाठी काही ना काही सांगायचा. धोनीजवळ प्रचंड अनुभव आहे. जेव्हा धोनी होता तेव्हा मी आणि चहल एकसाथ संघात खेळायचो. जेव्हापासून धोनीने निवृत्ती घेतलीय तेव्हापासून मी आणि चहल संघात एकत्र खेळलो नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मी मॅचेस खेळल्या आहेत. माही भाईच्याच काळात मी हॅट्रिकही घेतली होती. रिषभ पंत सध्या नवा आहे. तो जेवढा जास्त खेळेल तेवढं पुढे जाऊन विकेटच्या पाठीमागून तो बोलर्सला सल्ला देईल. मला नेहमी वाटतं गोलंदाजाला एका मजबूत साथीची आवश्यकता असते, जो दुसऱ्या बाजूने मदत करीन.
तो पुढे म्हणाला कि, कधीकधी मला वाटतं, हे आपल्यासोबत काय होतंय, याचा वारंवार माझ्या मनात विचार येतो. काळ अतिशय कठीण आहे. कधी कधी माझं मन म्हणतं तू आता पहिला कुलदीप राहिला नाही. कारकीर्दीतले काही दिवस असे असतात की जेव्हा तुम्हाला पाणी द्यायला आणि बेंचवर बसणं चांगले वाटतं, परंतु काही दिवस असे असतात जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अजिबात राहायचं नसतं”, अशा भावना कुलदीपने व्यक्त केल्या.




