मुंबई : राज्यात प्राणघातक म्युकरमायकोसीस आजाराचा फैलाव सुरु झाला आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सजग भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली. म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार असून त्याबाबत तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत या आजारावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले. राज्य सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनसाठी सहा कंपन्यांना 3 लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. हा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. याशिवाय, म्युकरमायकोसीसचे रुग्ण वाढत असल्याने त्यासाठी हाफकिन संस्थेला एक लाख इंजेक्शन्सची ऑर्डर देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. या आजाराबद्दल जागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे.याआजाराच्या जाणीवजागृतीसाठी मोहिम हाती घेण्यात येणार असून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफतउपचार करण्यात येणार आहेत
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 10, 2021




