गेल्या चार महिन्यांत पुणे महापालिकेने ३०० कोटी रुपयांपर्यंत निधी खर्च के ला आहे. आता महापालिकेची आर्थिक मर्यादा पाहता राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणेच नव्हे, तर राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर असून महापालिका राज्य सरकारकडे आणि आम्ही केंद्राकडे निधीची मागणी करत आहोत, असे सांगत कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.
विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील करोनाच्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, करोनाचे रुग्ण आणि मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रुग्णांना खाटा उपलब्ध होण्यासाठी खासगी प्रयोगशाळांनी करोना चाचणीचे अहवाल रुग्णांना परस्पर न देता महापालिकेला द्यावेत.
बैठकीत उपस्थित भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली. वाढते रुग्ण लक्षात घेता वैद्यकीय सुविधा वाढवणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयांतील कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या खाटा वाढवण्यात याव्यात. मोठी करोना काळजी केंद्रे उभारण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील खाटा वाढवाव्यात, याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे लक्ष वेधले. प्रशासनाकडून खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा नियंत्रणाखाली आणल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, वास्तवात तशी परिस्थिती नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.




