राज्यातील कोरोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आजही दिवसभरात राज्यात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर ११२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. आज दगावलेल्या रुग्णांमुळे राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तसेच, आज दिवसभरात १७ हजार १९ जणांना त्यांना डिस्चार्ज मिळाला. आतापर्यंत राज्यात २३,००,०५६ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.२ टक्के झाले आहे. सध्या राज्यात १४,२९,९९८ जण घरीच विलगीकरणात आहेत. तर १४ हजार ५७८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.




