मुंबई : मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायले. मुंबई महापालिकेचे बजेट मांडले जात असतानाच ही घटना घडली आहे. त्यांची प्रकृती ठीक असून वेळीच प्रकार लक्षात आला.
मुंबई महापालिकेत आज बजेट सादर होत आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील हे बजेट सादर करण्यासाठी उपस्थित राहणार होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्याने सहआयुक्त रमेश पवार हे सभागृहात उपस्थित राहिले. शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी सभागृहात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे 2021-22 चे वार्षिक अंदाजपत्रक शिक्षण समिती अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आले. हे बजेट वाचण्यासाठी रमेश पवार आपल्या खुर्चीवर बसले. त्यांच्यासमोर एक सैनिटायझरची बॉटल आणि एक पाण्याची बॉटल होती. परंतु त्यांनी चुकून यातील सॅनिटायझरची बॉटल घेतली आणि ते सॅनिटायझर प्यायले. ही चूक तात्काळ त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांना तातडीने पाणी देण्यात आलं.




