अहमदनगर: कोरोनाचं अपयश झाकण्याकरिता राज्य सरकार हे कंगना राणावतचा आधार घेत आहे अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार राधाकृष्ण विखेपाटील यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. कंगना रणावत हिने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कंगनावर सर्वच स्तरातून टीका होत आहेत. शिवसेनेनेदेखील कंगनावर आरोप केले तर कॉंग्रेसने थेट भाजपाच्या जे पोटात ते कंगनाच्या मुखात अशी प्रतिक्रिया दिली.
कंगनाची चर्चा करण्यापेक्षा कोरोनावर लक्ष देण्याची आज जास्त गरज आहे. कंगना रणावत हिने जे भाष्य केले आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही. मात्र अस्मितेचे प्रश्न तयार करून कोरोना हाताळण्यामध्ये आलेले अपयश झाकण्याकरिता राज्य सरकार कंगनाचा आधार घेत आहे, अशी घणाघाती टीका विखेंनी केली.
आज कोरोना हाताळण्यामध्ये ज्यांच्यावर मूळ जबाबदारी होती ते घरात बसलेले आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नसल्याने आज महाराष्ट्राचं चित्र कोरोनामुळे भयानक झालं आहे. त्यामुळे अपयश झाकण्यासाठी कंगनाचा आधार सरकारला घ्यावा लागतो यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं, अशी टीका नावं न घेता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली आहे.




