मुंबई : ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथे दाखल करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. झुनझुनवाला हे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांनी त्रस्त होते, त्यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु ते बरे झाल्यानंतर घरी परतले होते. अलीकडेच त्यांनी आकासा एअरलाईन्स सुरू केली.
ते व्यापारी आणि चार्टर्ड अकाउंटंट आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. झुनझुनवाला हंगामा मीडिया आणि ऍपटेकचे अध्यक्ष तसेच व्हाइसरॉय हॉटेल्स, कॉन्कॉर्ड बायोटेक, प्रोव्होग इंडिया आणि जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक होते.
5000 रुपयांनी गुंतवणूक सुरू केली
राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक होते. ते कॉलेजमध्ये असतानाच शेअर मार्केटमध्ये हात आजमावून पाहत होते. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. इथून पदवी घेतल्यानंतरच त्यांनी शेअर मार्केटमध्ये हात आजमावायला सुरुवात केली. झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये 5,000 रुपयांची गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सप्टेंबर 2018 पर्यंत ही गुंतवणूक वाढून 11,000 कोटी रुपये झाली होती.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान मोदी म्हणाले कि, “राकेश झुनझुनवाला अदम्य होते. जीवनाने परिपूर्ण, विनोदी आणि अंतर्दृष्टी असलेल्या त्यांनी आर्थिक जगामध्ये अमिट योगदान सोडले. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्सुक होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांशी आणि चाहत्यांशी माझ्या संवेदना. ओम शांती.”
Rakesh Jhunjhunwala was indomitable. Full of life, witty and insightful, he leaves behind an indelible contribution to the financial world. He was also very passionate about India’s progress. His passing away is saddening. My condolences to his family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/DR2uIiiUb7
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2022




