पुणे : पुण्यात एका २५ वर्षीय महिलेला तिच्या पतीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या उघड्या डक्टमध्ये ढकलून दिल्याची घटना घडली. यामध्ये महिलेच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. घरगुती वादातून महिलेच्या पतीने हे धक्कादायक कृत्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी रविवारी आरोपी पतीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथील काकडे वस्ती येथील एका इमारतीत नितीन (३२) आणि शैला दहिरे (25) हे दाम्पत्य राहते. त्यांच्यात घरगुती वाद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शनिवारी (22 जानेवारी) रात्री या जोडप्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण झाल्यानंतर बिल्डिंग पेंटर म्हणून काम करणाऱ्या नितीन याने त्याची पत्नी शैला यांना चौथ्या मजल्यावरून लिफ्टच्या उघड्या डक्टमध्ये ढकलून दिले. डक्टच्या पायथ्याशी मातीचा ढीग होता. डक्टच्या पायथ्याशी पडल्यानंतर शैला यांचा पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्याच इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात महिलेच्या पतीनेच हे भयंकर कृत्य केल्याचे समोर आले. त्यानंतर पतीवर पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप लावून पोलिसांनी आरोपी नितीन याला अटक केली आहे.




