मुंबई : सरकारकडून काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यातच 15 ऑगस्टपासून मुंबई लोकलमध्ये देखील सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे. मात्र यासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक आहे. लसीचे प्रमाणपत्र असलेल्यांनाच रेल्वे पास मिळणार आहे. हा रेल्वे पास नेमका कसा काढायचा या बद्दल जाणून घेऊयात.
रेल्वे पास कसा काढायचा?
ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं रेल्वेचा पास काढता येणार आहे. पास काढण्याआधी पाससाठीचा क्युआरकोड मिळवावा लागणार आहे. क्युआर कोड काढण्यासाठी तीन पद्धतींचा वापर करता येणार आहे.
- ऑनलाईन
बीएमसी प्रशासन आणि रेल्वे प्रशासन मिळून एक अॅप तयार करत आहे. पुढच्या दोन दिवसांत अॅप तयार होईल असं आयुक्तांनी सांगितलं आहे. या अॅपवर लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र अपलोड करुन क्युआर कोड मिळेल. हा क्युआर कोड तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळेल. - ऑफलाईन
वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र दाखवून क्यूआर कोड मिळेल. हा क्युआर कोड तिकीट खिडकीवर दाखवून पास किंवा तिकीट मिळेल. - रेल्वे स्थानक
एमएमआर परिसरातील रेल्वे स्थानकांवरही लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र दाखवून क्यूआर कोड देण्याची व्यवस्था उभी केली जाईल. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत चर्चा सुरु आहे.




