पुणे : पुण्यातील चाकण परिसरात दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. हॉटेल आणि वीटभट्टीचा व्यवसाय करणारा व्यावसायिक बाळू मरगज याने हे हत्याकांड घडवून आणले आहे. बाळू मरगज याची मुलगी त्याच्याच विटभट्टीवर काम करणाऱ्या एका कामगारासोबत पळून गेली होती. याचाच राग मनात धरुन या व्यावसायिकाने हत्या केल्याचं बोललं जात आहे. बाळू सिताराम गावडे (वय 26), राहुल दत्तात्रय गावडे (वय 28) अशी मृतावस्थेत आढळलेल्या दोन कामगारांची नावे आहेत. वीटभट्टी मालक आणि त्याच्या पाच साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातल्या मौजे करंजविहीरे या गावात ही दुहेरी हत्येची घटना घडली आहे. येथे बाळू मरगज नावाच्या या व्यावसायिकाचे ‘माणुसकी’ नावाचे एक हॉटेल असून या हॉटेलच्या समोर बाळू मरगज यांची वीटभट्टीदेखील आहे. वीटभट्टीवर काम करणारा कामगार बाळू सिताराम गावडे याच्यासोबत हॉटेल मालकाच्या 21 वर्षीय मुलीचे प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. त्यातूनच या कामगाराने मालकाच्या मुलीला पळवून नेले. यामध्ये दुसऱ्या एका कामगाराने त्यांची मदत केली होती. त्याचे नाव राहुल दत्तात्रय गावडे होते. राहुल बाळूचा मित्र होता.
बाळू आणि मालकाची मुलगी 14 तारखेला पळून गेले होते. याचा राग हॉटेल मालक आरोपी बाळू मरगज याच्या मनात होता. त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या तिघांचा शोध घेतला आणि त्यांना हॉटेलवर घेऊन आला. त्यानंतर बाळू गावडे आणि राहुल गावडे यांना तेथे बेदम मारहाण केली. तब्बल सहा जणांनी या दोघांना काठ्या, लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. दोन्ही मृत आसखेड खुर्दचे रहिवाशी आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनिल संभाजी कडाळे, राजू साहेबराव गावडे, किरण बाळू मेंगाळ, चंद्र करा उर्फ मुक्ता बाळू गावडे, आनंदा सीताराम जाधव, हॉटेल मालक बाळू मरगज अशी आरोपींची नावे आहेत.




