सांगली : सांगलीतील आटपाडी तालुक्यात घाणंद या गावात तीन भावंडांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. ही तीनही भावंडं कालव्यावर मासेमारीसाठी गेली होती. या घटनेत त्यांचा पाळीव कुत्राही वाहून गेला, त्याचा मृतदेह सापडला आहे. या तीन भावंडांपैकी एकाचा मृतदेह सकाळी सापडला असून दोन सख्ख्या भावंडांचा शोध सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाणंद तलावात पाणी सोडण्यात आल्यामुळे तलाव भरुन सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. बाहेर पडलेलं पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते. इथे अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने ह्या दोन सख्ख्या भावांची शेतजमीन आहे. काल दुपारी तीन वाजता मासेमारीसाठी लहू व्हनमाने हे स्वत:चा मुलगा वैभवसह भावाची दोन मुलं आनंद आणि विजय यांना घेऊन शेताकडे गेले. सोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता. बंधाऱ्यावर गेल्यानंतर लहू व्हनमाने यांना फोन आला, त्यामुळे मुलांना तिथेच सोडून ते निघून गेले. काही वेळाने परत आल्यानंतर त्यांना मुलं दिसली नाहीत. त्यांचा पाळीव कुत्रादेखील तिथे नव्हता.
घटनेची माहिती मिळताच कुटंबिय आणि शेजाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्याजवळ विजय आणि आनंदा यांचे कपडे आणि चपला सापडल्या. त्यानंतर कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात सापडला. घटनास्थळावरच बकेट आणि त्याला बांधलेली दोरी सापडली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरु होती. आनंदा अकुंश व्हनमाने (वय 14), विजय अंकुश व्हनमाने (वय 17) हे दोन सख्खे भाऊ आहेत, तर वैभव लहू व्हनमाने (वय 14) हा त्यांचा चुलत भाऊ आहे. तीनही मुलांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही.
दरम्यान पोलीस पाटील नंदिनी जुगदर, अनिता पाटील यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तहसिलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षिक भानुदास निंभोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगली आणि भिलवडीहून पाणबुडे बोलवले. त्यांनीही अंधारात मुलांचा शोध घेतला, परंतु, काहीही हाती लागलं नाही. सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु केली, तेव्हा दोन अडीच तासातच वैभवचा मृतदेह सापडला. पाण्याच्या प्रवाहात तीन भावंडं वाहून गेली, पण कुत्र्याचा मृत्यू कसा झाला हे अजूनही समजलेलं आहे.




