नागपूर : काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यात सुरु झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इंजेक्शनचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकार्यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे इंजेक्शन तयार होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असं जेनेटिक लाईफ सायन्सेसचे संचालक डॉ. क्षीरसागर यांनी म्हटले आहे.
अॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा पाहता गडकरी यांनी हे इंजेक्शन विदर्भात तयार व्हावे, यासाठी प्रयत्न केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीला १४ मे रोजी अॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शन निर्मितीची मंजुरी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून ही मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार वर्धा येथून या इंजेक्शनची निर्मिती सुरु झाली आहे. कच्चा माल उपलब्ध झाल्यास दररोज २० हजार इंजेक्शनचे उत्पादन ही कंपनी करणार आहे.
केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी की कोशिशों से कोविड के बाद तेज़ी से फैल रहे ब्लैक फंगस इन्फेक्शन के इलाज के लिये वर्धा में जेनेटेक लाईफ सायन्सेस ने Amphotericin B Emulsion इंजेक्शन तयार कर लिया है। अब तक भारत में एक ही कंपनी इसका उत्पाद करती थी। pic.twitter.com/X5M0IsCnp2
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) May 27, 2021
जेनेटिक लाईफ सायन्सेस हे इंजेक्शन १२०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. सध्या हे इंजेक्शन ७००० रुपयांपर्यंत मिळत आहे. गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे या इंजेक्शनचा परवाना मिळाला असून इंजेक्शन निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही गडकरी यांनी उपलब्ध करून दिला. आता हे इंजेक्शन तयार झाले आहे. कच्चा माल उपलब्ध झाला तर या इंजेक्शनची निर्मिती वाढेल आणि तुटवडा जाणवणार नाही. सोमवार पासून या इंजेक्शनचे वितरण सुरु होणार आहे.




