कॅलिफोर्निया : फेसबुकची मूळ कंपनी मेटाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) शेरिल सँडबर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, आता जेवियर ओलिवन हे मेटाचे नवीन सीओओ असतील. शेरिल सँडबर्ग यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे की, भविष्यात त्या आता समाजाच्या हितासाठी काम करणार आहेत.
शेरिल सँडबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी जेव्हा 2008 मध्ये कंपनीत रुजू झाले तेव्हा मला वाटले होते की मी पुढील पाच वर्षे येथे राहीन, पण 14 वर्षे उलटून गेली आहेत. आता आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या, ‘पूर्वीच्या तुलनेत आता खूप बदल झाले आहेत. आपण कोणतेही उत्पादन बनवतो, त्याचा लोकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी बनते.
शेरिल गेल्या 14 वर्षांपासून या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संबंधित होत्या. त्यांनी 2008 मध्ये गुगल सोडले आणि फेसबुक जॉईन केले. फेसबुक सार्वजनिक प्लॅटफॉर्म बनण्याच्या 4 वर्षांपूर्वी त्या कंपनीत रुजू झाल्या होत्या. शेरिल यांनी कोणत्या कारणांमुळे कंपनी सोडली, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. तथापि, पुढे जाऊन समाजासाठी परोपकारी कार्य करण्यावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची त्यांची योजना आहे, असेही त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये शेरिल फेसबुकशी संबंधित राहणार असल्याचे लिहिले आहे. ती फेसबुकच्या संचालक मंडळाचा एक भाग असेल. याशिवाय त्यांनी हेही सांगितले की, जेवियर ओलिवान यांना फेसबुकचे नवीन सीओओ बनवण्यात आले आहे.




