मुंबईविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय आघाडीचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने सार्थ ठरवला. मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांना पॉवर-प्लेच्या षटकांमध्येच त्याने माघारी धाडलं.
दुखापतीनंतर संघात परतलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा केवळ ४ धावा काढून तिसऱ्याच षटकात झेलबाद झाला. त्यानंतर डावाच्या पाचव्या षटकाला क्विंटन डी कॉकने दमदार सुरूवात केली होती. पहिल्या ३ चेंडूवर डी कॉकने १ चौकार आणि २ षटकार हाणले होते, पण चौथ्या चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. रोहित आणि डी कॉक या दोघांनाही संदीप शर्मानेच माघारी धाडले. याचसोबत ५३ बळींसह संदीप पॉवर-प्लेच्या षटकात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. अशा प्रकारे ५२ बळी घेत यादीत अव्वल असलेल्या झहीर खानचा विक्रम त्याने मोडला.