मुंबई: ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर नवा आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी पाच सरकारी बंगले वापरण्यासाठी घेतले आहेत. मुख्यमंत्रीपदावरील ‘निस्वार्थी व्यक्ती’ एकाचवेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे, अशी खोचक टिप्पणी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना शिंदे यांनी ‘नंदनवन’ बंगला वास्तव्यासाठी घेतला. दोन सरकारी बंगले एकत्र करून त्यांनी ‘नंदनवन’ बंगल्याचा विस्तार केला. मुख्यमंत्री म्हणून ‘नंदनवन’मध्येच राहीन असे त्यांनी जाहीर केले, पण आता त्यांनी ‘नंदनवन’वर ताबा ठेवून ‘वर्षा’वर मुक्काम हलवला. आता कार पार्किंग आणि भेटायला येणाऱ्यांची गर्दी या सबबीखाली ‘अग्रदूत’ व ‘तोरणा’ हे बंगले ताब्यात घेतले. त्याहीपुढे ते गेले व पक्ष कार्यालयास जागा हवी म्हणून मंत्रालयासमोरील ‘ब्रह्मगिरी’ बंगल्याचाही ताबा घेतला. मुख्यमंत्रीपदावरील ‘निःस्वार्थी व्यक्ती’ एकाच वेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे, असे ‘सामना’त म्हटले आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.




