मध्य प्रदेशातील शिवसेनेचे नेते रमेश साहू यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडली, असं पोलिसांनी सांगितलं.
इंदौरमधील उमरीखेडा येथे तेजाजी शहर पोलीस ठाणे हद्दीत शिवसेनेचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष रमेश साहू यांचा ढाबा आहे. या ढाब्यावरच अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात ते जागीच मरण पावले. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेली त्यांची पत्नी व मुलगी जखमी झाली आहे. सकाळी ढाब्यावरील कर्मचारी आत गेल्यानंतर ही घटना समोर आली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनाला पाठवून चौकशी सुरू केली आहे. घटनास्थळावरून कोणतीही वस्तू चोरीला गेलेली नसून, आरोपी केवळ साहू यांची हत्या करून फरार झाले. साहू यांच्यावर इंदौरमधील दोन पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आपसातील वादातून ही हत्या केली गेल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. पोलिसांनी ढाब्यावर कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू केली आहे.




