मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानावरुन शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला. आदित्य ठाकरेंसह सर्व पदाधिकारी शिवसेना भवनातून चर्चेत सहभागी झाले होते. “एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? नगर विकास खातं दिलं. माझ्याकडची दोन खाती दिली” असा सवाल यावेळी ठाकरेंनी विचारला. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असं खुलं आव्हान यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले कि, “सत्ता आल्यानंतर आधी कोव्हिडचं विचित्र लचांड गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. कोव्हिड संपतो तर मानेचा त्रास सुरु झाला आणि आता हा त्रास. कोण कोणत्या वेळी कसं वागेल हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करतो. माझ्या मानेवर शस्त्रक्रिया गरजेची होती. मोदीही म्हणाले होते, ऑपरेशन हे हिंमतीचं काम आहे, पण हिंमत माझ्या रक्तातच आहे. पहिल्या ऑपरेशनच्या वेळी सगळं ठीक होतं, मग शरीराला त्रास होऊ लागला. शरीराचे काही भाग बंद पडत होते, म्हणून दुसरं ऑपरेशन केलं. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला.
मला वाटलं मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हलतेय, पण ते मानेचं दुखणं होतं. कोरोनामुळे डोळ्यात पाणी आलं आहे, ते अश्रू नाहीत. कोण कसं वागलं यात आपल्याला जायचं नाही. वर्षा सोडली, म्हणजे मी मोह सोडला, पण जिद्द सोडली नाही, अजूनही जिद्द कायम आहे. स्वप्नातसुद्धा विचार न केलेल्या पदावर मी आलो, पण मला पदाचा मोह नाही. मला सत्तेचा लोभ नाही, मी वर्षा सोडून मातोश्रीवर आलो, असंही ठाकरेंनी सांगितलं. मी बरा होऊ नये म्हणून काही जण पाण्यात देव ठेवून बसलेले होते. मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप करण्यात आलं आहे. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असं खुलं आव्हान यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं आहे.
माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडावरची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं? आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन? एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं, त्यांना नगर विकास खातं दिलं, माझ्याकडची दोन खाती शिंदेंना दिली. संजय राठोडांवर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं. विठ्ठल-बडव्यांवर जे बोलत आहेत, त्यांचा पोरगा खासदार आहे. बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करायचा प्रयत्न होत आहे. आपलीच काही लोकं घेऊन शिवसेनेवर सोडण्यात आली. मात्र सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, बाळासाहेब असताना ते विठ्ठल आणि मी बडवा होतो, आता मी विठ्ठल आणि आजूबाजूचे बडवे. मला वीट आलाय याचा, म्हणजे मी वीट हाणणारच, यांना ठेऊन काय करु? हे सारं भाजपने केलंय, तिथे गेलेल्यांची आग्य्राहून सुटका करावीच लागेल. तुम्हाला जर तिथे भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, मी थांबवणार नाही. मी लायक नसेन तर पद सोडायला तयार आहे, मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी गौण आहे. कारण बाळासाहेबांसाठी माझ्याहून लाडकं अपत्य म्हणजे शिवसेना होती.