दिल्ली : जोडीदाराने 14 वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्यानंतर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत एका 33 वर्षीय महिलेने तिच्या लिव्ह-इन पार्टनरने 14 वेळा जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्यामुळे तिने आत्महत्या केली. दक्षिणपूर्व दिल्लीतील जैतपूर परिसरात ५ जुलै रोजी पीडितेने आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांना घरातून एक सुसाईड नोट सापडली असून त्यात ती एका पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघड झाले आहे, ज्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. वृत्तानुसार, पीडितेने तिच्या सुसाईड नोटद्वारे खुलासा केला की त्या व्यक्तीने 14 वेळा गर्भपात करण्यास भाग पडले आणि नंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि तिच्याकडे जीवन संपवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही. पोलिसांनी एका सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम करणाऱ्या आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जैतपूर येथील महिलेच्या आत्महत्येबाबत पोलिसांना ५ जुलै रोजी पीसीआर कॉल आला होता. महिला एका घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. त्यानंतर महिलेला तातडीने एम्समध्ये नेण्यात आले, जेथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी मोबाईल फोन तसेच फाशीसाठी वापरलेले स्टूल जप्त केले आहे. एम्समधील डॉक्टरांनी एक सुसाईड नोट आणि व्हिसेरा पोलिसांना सुपूर्द केला, असे पोलिसांनी सांगितले. ही महिला मूळची बिहारमधील मुझफ्फरपूरची आहे. पोलिसांनी तिच्या पालकांना माहिती देऊन शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 376 (बलात्कार) आणि 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. ही महिला गेल्या ७-८ वर्षांपासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. साऊथ एक्स्टेंशनमधील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेच्या पतीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि त्यांनी पोलिसांना सांगितले की, तो आणि त्याची पत्नी सुमारे आठ वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत. आरोपीला पकडण्यासाठी छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.




