उत्तर प्रदेश : प्रयागराजमध्ये सोमवारी चालत्या ट्रेनमधून एक दोन वर्षांची मुलगी खाली पडली. परंतु, सुदैवाने या अपघातातून ती बचावली आहे. ही चिमुकली सुरक्षित असल्याचं पाहून तिच्या आईच्या जीवात-जीव आला. मुलीला जास्त दुखापत झाली नाही, ही देखील चांगली बाब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माणिकपूर येथील इंदिरा नगर येथे राहणाऱ्या माया यांना त्यांच्या पतीने मारहाण करून घराबाहेर काढले होते. तेव्हापासून त्या ट्रेनमध्ये साफसफाई करून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह करतात. दोन वर्षांची मुलगी मीनाक्षीही त्यांच्याबरोबरच असते. सोमवारी माया माणिकपूर स्थानकातून गोदान एक्सप्रेसमध्ये साफसफाई करण्यासाठी चढल्या होत्या. त्यावेळी मीनाक्षी आपल्या आईला पकडून ट्रेनच्या दाराजवळ उभी होती. परंतु ट्रेन मानकवार गावाजवळ येताच ट्रेनला झटका बसला आणि मीनाक्षी दरवाजातून खाली पडली.
मुलगी खाली पडल्यामुळे माया खूप घाबरली. ती ओरडू लागली की ट्रेन थांबवा. परंतु, ट्रेनचा वेग खूप जास्त असल्यामुळे कोणालाही काही सुचत नव्हते. मग कोणीतरी चेन ओढण्यास सांगितले. त्यानंतर मायाने पळत जाऊन चेन ओढण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी तिची मदत केली. परंतु, ट्रेन तोपर्यंत अपघाताच्या ठिकाणापासून तीन किलोमीटर पुढे आली होती. मात्र, ट्रेन थांबताच माया अनवाणी पायांनी रुळावरून पळत सुटली.
दरम्यान, ही चिमुकली ज्या ठिकाणी ट्रेनमधून खाली पडली, तिथे आरती पटेल नावाची मानकवार गावात राहणारी महिला उपस्थित होती. मुलगी रुळावर पडल्याचे पाहताच तिने तात्काळ मुलीला उचलून उपचारांसाठी घरी नेले. चिमुकलीच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता आणि ती बेशुद्ध पडली होती. आरतीने आईप्रमाणे मीनाक्षीची काळजी घेतली. त्यानंतर ती शेजाऱ्यांच्या मदतीने मुलीला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. त्यानंतर इंजेक्शन दिल्यानंतर या मुलीला शुद्ध आली.
दुसरीकडे, माया आपल्या मुलीला वाचवण्यासाठी रुळावर धावत होती. ती मुलीला शोधत होती. तिला हेदेखील समजत नव्हते की मुलगी किती अंतरावर पडली आहे. ती फक्त पळत होती. फक्त अंदाजाने मुलीचा शोध घेण्यासाठी ती पळत होती. दरम्यान, तिच्या पायाला अनेक ठिकाणी जखमा झाल्या, त्याकडेही तिचे लक्ष गेले नाही. ट्रॅकवर दोनदा दगडाला अडकून ती खाली पडली. तिच्या पायातून रक्त वाहत होते, पण ती थांबली नाही. बरीच दूर आल्यानंतर तिला एका ठिकाणी रेल्वे रुळावर गर्दी दिसली. ती तिथे पोहोचली तेव्हा तिची अवस्था पाहून लोकांनी विचारले, काय झाले? तू का पळत आहेस? मायाने सांगितले की साहेब, माझी मुलगी ट्रेनमधून खाली पडली होती. तिला काय झाले? ती ठीक आहे ना? यावर एका वृद्ध व्यक्तीने तिला धीर दिला आणि सांगितले की घाबरू नको, तुझी मुलगी जिवंत आहे. जखमी झाल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत.
गवतामुळे चिमुकलीचे प्राण वाचले
ही चिमुकली पडली तेव्हा ट्रेनचा वेग खूप जास्त होता. आरती यांनी सांगितले की पावसामुळे रेल्वे रुळाच्या कडेला खूप गवत उगवले आहे. मुलगी त्याच गवतावर पडली, त्यामुळे तिला गंभीर जखमा झाल्या नाही. मुलीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. पण ती खूप घाबरली होती. स्थानिकांनी माया आणि चिमुकलीला जेवायला दिले आणि तिची आर्थिक मदत केली.




