आंध्रप्रदेश : आश्रमाच्या स्वामीने एका अनाथ मुलीवर दोन वर्षे बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पीडित अनाथ मुलीने केलेल्या तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी आरोपी स्वामीला सोमवारी मध्यरात्री अटक केली. पीडितेचे वय 15 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे आई-वडील फार पूर्वीच मरण पावले आहेत. नातेवाइकांनी तिला राजमहेंद्रवरमजवळील वसतिगृहात दाखल केले होते. जिथे तिने पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी काही साधूंच्या माध्यमातून ती संबंधित आश्रमात सेवेसाठी पोहोचली. तिला आश्रमातील गायींची सेवा करण्याचे काम देण्यात आले होते. गायी चारणे आणि त्यांचे शेण साफ करणे हे तिचे काम होते. मात्र रात्री आश्रमाचा स्वामी तिला त्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार करायचा. तो मुलीला धमकावत असे की जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो तिला ठार मारेन. पीडितेने स्वामींना विरोध केला, तेव्हा त्याने तिला साखळीने बांधून ठेवण्यास सुरुवात केली. तिला जेवायला फक्त भात आणि पाणी दिले जायचे.
13 तारखेला आश्रमात काम करणाऱ्या मोलकरणीच्या मदतीने पीडित मुलीने तिथून पळ काढला. मोलकरणीने तिला पैसेही दिले होते. तिथून ती ऑटोने थेट विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तिथे ती तिरुमाला एक्सप्रेसमध्ये चढली. ट्रेनमधील एक महिला प्रवाशी तिच्याशी बोलली. पीडितेने सर्व प्रकार त्या महिलेला सांगितला. त्यानंतर त्या महिला प्रवाशाने मुलीला तिच्यासोबत राजमहेंद्रवरम येथे नेले. यानंतर ही महिला इतर काही लोकांसोबत मुलीला घेऊन विजयवाडा येथील बाल कल्याण समितीकडे गेली. तेथे मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा खुलासा केला. विजयवाडा येथील बाल कल्याण समितीसमोर मुलीने आश्रमाबाबत सांगितले. तिने सांगितले की, आश्रमात 14 मुले होती, त्यापैकी ती एकमेव मुलगी होती. पीडितेने सांगितले की, आश्रमातील लोक म्हणायचे की, स्वामींनी यापूर्वी देखील अन्य एका मुलीवर बलात्कार केला होता.
CWC सदस्यांनी मुलीला विजयवाडा येथील दिशा पोलिस ठाण्यात पाठवले, जिथे पोलिसांनी मुलीची चौकशी केली आणि तिचे म्हणणे ऐकून घेत गुन्हा नोंदवला. प्रकरणाचे गांभीर्य पाहून तात्काळ एफआयआर नोंदवण्यात आली. स्वामीजीविरुद्ध कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी बेजवाडा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी स्वामीला ताब्यात घेतले आहे.




