Indian Railways Rules Changed : आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो, तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा एक छोटीशी चूकही तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. रेल्वेने नुकताच केलेला बदल रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत आहे. हे सर्वसाधारणपणे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना माहीत असायलाच हवे.
रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आता तुमच्या सीट, कंपार्टमेंट किंवा कोचमधील कोणताही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात बोलू शकणार नाही किंवा मोठ्या आवाजात गाणी ऐकू शकणार नाही. रेल्वेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जेणेकरून प्रवाशांच्या झोपेचा त्रास होणार नाही आणि त्यांना प्रवासादरम्यान शांत झोप घेता येईल.
अनेक प्रवासी अनेकदा तक्रार करतात की त्यांच्या कोचमध्ये एकत्र प्रवास करणारे लोक फोनवर मोठ्याने बोलतात किंवा रात्री उशिरापर्यंत गाणी ऐकतात. रेल्वे एस्कॉर्ट किंवा मेंटेनन्स कर्मचारीही मोठ्याने बोलतात, अशीही काही प्रवाशांची तक्रार होती. याशिवाय अनेक प्रवासी रात्री १० नंतरही दिवे लावतात, त्यामुळे त्यांची झोप उडते. या पार्श्वभूमीवर रेल्वेने नवा नियम केला आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रवाशाने नियमांचे पालन केले नाही, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
जाणून घ्या काय आहेत नवीन नियम
ट्रेनमध्ये प्रवास करताना रात्री 10 वाजल्यानंतर जर तुम्ही मोबाईलवर मोठ्याने बोलत असाल तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. नवीन नियमांनुसार, रात्रीच्या प्रवासात प्रवासी मोठ्याने बोलू शकत नाहीत आणि गाणी ऐकू शकत नाहीत. कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्यास त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी रेल्वेतील उपस्थित कर्मचाऱ्यांची असेल.




