नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून दिल्लीत सुरु होत आहे. कोरोनाच्या दुसरा लाटेतला कहर आणि तिसऱ्या लाटेची भीती, प.बंगालच्या निकालानंतर विरोधकांमध्ये वाढलेला आत्मविश्वास, 7 महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन, या पार्श्वभूमीवर हे आंदोलन वादळी ठरण्याची शक्यता आहे. 19 जुलै ते 13 ऑगस्ट असा अधिवेशनाचा कालावधी आहे.
कोरोनामुळे मागच्या अधिवेशनात संसदेची दोन्ही सभागृह दोन शिफ्टमध्ये चालवावी लागली होती. यावेळी दोन्ही सभागृह एकाचवेळी सकाळी 11 ते 6 या वेळेत चालणार आहेत. ज्या खासदारांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांना आरटीपीसीआर चाचणीची गरज नाही. या अधिवेशनात एकूण 23 विधेयकं सरकारकडून प्रस्तावित आहेत. त्यापैकी 6 जुनी तर 17 नवी विधेयकं आहेत.
- डीएनए तंत्रज्ञान वापर नियमन विधेयक- डीएनए तंत्रज्ञानाचा वापर केवळ ठराविकच पद्धतीनं करता यावा, त्यातले गैरप्रकार टाळण्यासाठी विधेयक
- पेन्शन फंडसंदर्भात सरकारनं बजेटमध्ये ज्या घोषणा केलेल्या त्यानुसार एनपीएस ट्रस्ट पेन्शन फंडापासून वेगळं करणारं विधेयक
- सामान्य लोकांच्या बँकेतल्या ठेवींना विमा संरक्षण देणारं ठेव विमा दुरुस्ती विधेयक
- वीजेच्या वितरणात खासगी कंपन्यांनाही अधिक मुभा देणारे वीज वितरण दुरुस्ती विधेयक
या महत्वाच्या विधेयकांसह एकूण 23 विधेयकं अधिवेशनात मांडली जाणार आहेत.




