राजस्थान : राजस्थानच्या भरतपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे ५ रुपयांचे लिंबू घेण्यावरून वाद इतका वाढला की, दुकानदाराने त्याच्या साथीदारांसह ग्राहकावर गोळीबार केला. ही बाब सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे की, एका व्यक्तीला एवढा राग कसा येऊ शकतो की त्याने 5 रुपयांच्या लिंबूसाठी गोळी झाडली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण डीग पोलिस स्टेशन हद्दीतील बहज गावचे आहे. जिथे दिनेश जाटव (वय 30) हा व्यक्ती गुरुवारी संध्याकाळी लिंबू घेण्यासाठी महेंद्र बच्चू यांच्या दुकानात गेला होता. यावेळी दिनेशने 5 रुपयांच्या लिंबासाठी 100 रुपयांची नोट दुकानदाराला दिली, त्यानंतर सुट्ट्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला, प्रकरण शिवीगाळापर्यंत पोहोचले. यानंतर दुकानदार काही लोकांना घेऊन रात्री 8.30 वाजता दिनेशच्या घरी पोहोचला. त्यांनी शिवीगाळही केली आणि नंतर गोळीबार केला. गोळी दिनेशच्या कानाला स्पर्श करून गेली.
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी उशिरा दुकानदार आणि ग्राहक यांच्यात वाद झाला, त्यानंतर दुकानदाराने त्याच्या साथीदारांसह ग्राहकावर गोळीबार केला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपीचा शोध सुरु आहे.




