केरळ : बलात्कार झाल्यानंतर स्वाभिमान असणारी कोणतीही स्त्री बलात्कार झाल्यानंतर मरेल किंवा पुन्हा अशी गोष्ट होऊ देणार नाही. असं वादग्रस्त वक्तव्य केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुल्लाप्पल्ली रामचंद्रनं यांनी केलं आहे. त्याच्या या वक्तव्यावरून आता संताप व्यक्त केला जात आहे.
तिरुवनंतपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनात बोलताना रामचंद्रन यांनी हे वक्तव्य केलं.रामचंद्रन म्हणाले कि एक महिला उठते आणि आपल्यावर बलात्कार झाल्याचा दावा राज्यभर करतेय. तिला पडद्यामागे उभं केलं गेलं आहे. कधी बाहेर यायचं हे विचारत राहते. मुख्यमंत्रीजी, तुमचा हा खेळ इथे चालणार नाही. हे धमक्याचं राजकारण इथे चालणार नाही. केरळमधील लोक हे समजू शकतात. आपण एका वेश्येला आणून तिच्या कथा बनवू शकता, पण केरळला हे ऐकून कंटाळा आला आहे. एखाद्या महिलेनं तिच्यावर एकदा बलात्कार झाल्याचे सांगते तर आम्हाला समजते. स्वाभिमान असणारी कोणतीही स्त्री बलात्कार झाल्यानंतर मरेल किंवा पुन्हा अशी गोष्ट होऊ देणार नाही. पण, ही महिला राज्यभर तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचं सांगत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की, या महिलेला समोर करून तुम्ही राजकारण करत आहात, असं रामचंद्रन म्हणाले.
सौर ऊर्जा घोटाळ्यात अडकलेल्या महिलेविषयी रामचंद्रन यांनी हे वक्तव्य केलं आहे. या महिलेनं अलिकडेच काँग्रेस नेत्यानं आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या महिलेवर टीका करताना रामचंद्रन यांनी वेश्येसोबत तुलना केली आहे. या विधानावरून रामचंद्रन यांच्यावर टीका सुरू झाली. त्यानंतर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. हे सरकार भ्रष्टाचारानं वेढलं गेलं आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहे, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या वक्तव्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीशी जोडला गेला असेल, तर त्याबद्दल मी मनापासून खेद व्यक्त करतो. काही जण माझं वक्तव्य हे महिलाविरोधी टीका केल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं रामचंद्रन यांनी म्हटलं आहे.